29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रउद्योग विश्वाने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे - सुभाष देसाई

उद्योग विश्वाने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे – सुभाष देसाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन सुरू झाले असून उद्योग विश्वाने राज्य शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, शासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. वसई-विरार परिसरातील तीन औद्योगिक संघटनांचा वतीने आयोजित चर्चासत्रात देसाई बोलत होते. यावेळी वसई विरार औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष अनिल आंबर्डेकर, गोवालिस संघटनेचे सी. ए. अँटो, वसई तालुका औद्योगिक संघटनेचे अभय जिन्सिवाले, आशिष आपटे आदी सहभागी झाले होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर उपस्थित होते.

वसई पट्ट्यातील उद्योजक निर्यातीत आघाडीवर आहेत. शासनाने निर्यात प्रधान उद्योग सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे तसेच अत्यावश्यक सेवा, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग, निरंतर प्रक्रिया करणारे उद्योग या सा-यांना उत्पादन सुरु ठेवण्याची संमती मिळाली आहे. उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे देसाई म्हणाले. वसई-विरार परिसरातील उद्योग संघटनांनी आपल्या कर्मचान्यांसाठी, कोविड चाचण्या, रुग्णालय आदी सुविधा सज्ज ठेवल्याबद्दल देसाई यांनी संबंधितांचे कौतुक केले.

उद्योगांमध्ये २० ते ४० वयोगटातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने काम करतो. लसिकरणासाठी ४५ वर्षे वयाची अट आहे. ती अट शिथिल करून या २० ते ४० वयोगटातील कामगारांचा लसीकरणासाठी समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुढील पंधरा दिवसांत रुग्णवाढीचा वेग वाढण्यात शक्यता आहे.
खाटांची संख्या कमी पडत आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे. परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

उद्योग विश्वाने या लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन देसाई यांनी केले. कोरोना संकटामुळे राज्यशासन दुहेरी संकटात आहे. या संकट काळात उद्योगांना झळ बसणार आहे. त्यांनी ती सहन करण्याची तयारी दाखवावी. कामगारांच्या हिताचे रक्षण करावे व कामगार कपात टाळावी असे आवाहन केले.

शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या