19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeमहाराष्ट्रसिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्याने ताशेरे

सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्याने ताशेरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : सिंचन प्रकल्प दीर्घकाळ रखडल्यामुळे कॅगचे जोरदार ताशेरे ओढले आहेत. वेळ आणि खर्चाचा अतिरेक टाळण्यासाठी कालबद्ध पद्धतीने काम करण्याची शिफारसदेखील या रिपोर्टमधून करण्यात आली. राज्यातील ६ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात अक्षम्य दिरंगाई झाल्याप्रकरणी कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. यातील चार प्रकल्प ११ ते २५ वर्षाच्या विलंबाने पूर्ण झाले, तर दोन प्रकल्प २० वर्षे होऊनही पूर्ण झाले नसल्याचे कॅगने समोर आणले. कॅगचा २०२२ चा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला.

राज्यातील आंधळी प्रकल्प, पिंपळगाव प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, हरणघाट प्रकल्प, सोंड्याटोला प्रकल्प, वाघोली बुटी प्रकल्प आदी प्रकल्प ११ ते २५ वर्षांच्या फरकाने पूर्ण झाले. यातील काही प्रकल्प अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. याबद्दल जोरदार कॅगने अहवालात ताशेरे ओढले. एक तर या प्रकल्पांना मर्यादेच्या बाहेर विलंब झाला आणि यामुळे या प्रकल्पांचा खर्चही अवाढव्य वाढत गेला. प्रकल्प पूर्ण होण्यास दीर्घकाळ लागल्यानेच या प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

यातील आंधळी प्रकल्पाचा मूळ अंदाज खर्च १ कोटी १५ लाख इतका होता, तो वाढून १७ कोटी ९७ लाखांवर पोहोचला. पिंपळगाव (ढाले) प्रकल्पाचा मूळ अंदाजित खर्च १० कोटी १ लाखावरून थेट ९५ कोटी ३९ लाखांवर गेला. पूर्णा प्रकल्पाचा खर्च ३६ कोटी ४५ लाखांवरून २५९ कोटी ३४ कोटींवर गेला. तसेच हरणघाट प्रकल्प १२ कोटी १९ लाखांवरून ४९ कोटी २१ लाखांवर गेला. सोंड्याटोला प्रकल्पाचा खर्च १३ कोटी ३३ लाखांवरून १२४ कोटी ९३ लाखांवर गेला, तर वाघोली बुटी प्रकल्पाचा खर्च ९ कोटी ५० लाखांवरून ५३ कोटी २२ लाखांवर गेला.

सार्वजनिक पैशांचा समावेश असलेल्या कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी खर्च अंदाजित रकमेच्या आत ठेवणे हे प्रकल्प व्यवस्थापनासमोरील प्रमुख आव्हान आहे. मात्र, जटिल सिंचन प्रकल्पाच्या नियोजनातील अपुरेपणा किंवा अंमलबजावणीतील अकार्यक्षमतेमुळे खर्चात अनेक पटींनी वाढ होते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यावर परिणाम होत असल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.

या प्रकल्पांच्या कामावरून ताशेरे
-आंधळी प्रकल्प १९८६ ला सुरू झाला आणि तो २०१४ ला २५ वर्षांनी पूर्ण झाला.

-पिंपळगाव (ढाले) प्रकल्प १९९६ ला सुरू झाला तो अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

-पूर्णा प्रकल्पाचे काम १९९५ साली सुरू झाले. अजूनही हा प्रकल्प अपूर्ण आहे.

-हरणघाट प्रकल्प १९९९ ला सुरू झाला आणि १२ वर्षांनी २०१४ ला पूर्ण झाला.

-सोंड्याटोला प्रकल्पाचे काम १९९५ साली सुरू झाला आणि १३ वर्षांनी २०१२ ला पूर्ण झाला.

-वाघोली बुटी हा प्रकल्प १९९३ ला सुरू झाला आणि ११ वर्षांनी २००६ साली पूर्ण झाल्याचे कॅगने समोर आणले आहे.

कॅगची शिफारस
मोठे जलसंपदा प्रकल्प वेळेत आणि अंदाजित खर्चात पूर्ण होतील, यासाठी त्या प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी योग्य करण्याची शिफारस कॅगने आपल्या अहवालात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या