23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रहे सरकार आहे की सर्कस..?

हे सरकार आहे की सर्कस..?

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोणाचा कोणाला पायपोस राहिलेला नाही. सगळे मंत्री, राज्यमंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात. मंत्री झाले आपापल्या विभागाचे राजे व प्रत्येक विभागात एक एक वाझे, अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आघाडी सरकारच्याच नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारवर प्रखर टीका केली. महाराष्ट्रामध्ये सध्या जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का हा प्रश्न आहे. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे व प्रत्येक विभागात एक एक वाझे’ अशी अवस्था आहे. कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो, मात्र या सरकारमधील मंत्री, राज्यमंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात. निर्णय होतात, त्याला एका तासात स्थगिती येते, तिसऱ्या दिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, असा गोंधळ सुरू आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यातही सरकार अपयशी ठरले. देशातील सर्वाधिक संसर्ग व सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होऊनही सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. सरकारच्या अनेक घोटाळ्यांची माहिती आमच्याकडे आली आहे व ती चव्हाट्यावर येऊ नये यासाठीच सरकारने अधिवेशनपासून पळ काढल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

ओबीसी आरक्षणाचा विषय उचलून धरणार
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मागासवर्गीय आयोग नेमून इम्पिरीकल डेटा जमा करणे आवश्यक असताना सरकारने १५ महिने काहीही केले नाही. अजूनही हा निर्णय घेतलेला नाही. २६ तारखेचे आंदोलन करून आम्ही थांबणार नाही. हा विषय धसाला लावू, ओबीसींना आरक्षण परत मिळत नाही तोवर सरकारला झोपू देणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ कमाईवर-चंद्रकांतदादा पाटील
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही. सत्ता किती काळ टिकेल याचा भरवसा वाटत नसल्याने सगळा भर कमाई करण्यावर आहे आणि राज्यात भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. महाविकास आघाडीचे नेते कोडगेपणाने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत. या लोकांनी भ्रष्टाचाराबरोबरच खोटारडेपणाचेही टोक गाठले आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

२६ ला राज्यव्यापी आंदोलन-पंकजाताई मुंडे
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे २६ जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी वक्तव्ये करतात. मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या तरी आघाडी सरकारमधील मंत्री गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला.

प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. आशिष शेलार तसेच मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तर अन्य पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा-भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या