अहमदनगर : मशिदीवरचे लाऊडस्पीकर सरकारने काढले नाहीत, तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यांच्या या आदेशावर पक्षातील नगरसेवक देखील नाराज आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हाच धागा पकडून राज ठाकरेंवर निशाणा साधला.
अरे बाबा बोलणं सोपंय, पण आपण काय सांगतोय, त्याचे काय परिणाम होतील, हे पण पाहिलं पाहिजे ना…. , असे अजितदादा म्हणाले. नगरमध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी अजितदादांनी आपल्या भाषणातील दोन-चार मिनिटे राज ठाकरेंवर सडकून प्रहार केले. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील आदेशामुळे पक्षातील मुस्लिम पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत तर मुस्लिमबहुल प्रभागांचं नेतृत्व करणा-या वसंत मोरे यांनी थेट राजादेश धुडकावून लावत,‘मला माझ्या प्रभागात शांतता ठेवायची आहे’, असे म्हणत एकप्रकारे राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचे स्पष्ट केले.
मनसे पक्षातूनच राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध होत असल्याचे पाहून आज अजित पवार यांनी भोंग्यावरून राजकीय फटकेबाजी केली तसेच राज ठाकरे यांना लक्ष्य केले. काही पक्षांचे नेते सांगतात, इथे असे करा, तिथे भोंगा लावा… अरे भाषण करणे सोपंय रे बाबा… आता त्यांच्याच पक्षातील नगरसेवक सांगायला लागले, आम्हाला इथे निवडून यायचे आहे. हे तुम्ही काय सांगताय… ही आज पुण्यात परिस्थिती आहे. समाजासमाजात ही दुही कशाकरिता..? याच्यातून आपण काय साधणार आहोत? देशाला आणि राज्याला आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत? आता कुठेतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करण्याची वेळ आली की नाही? , असे एक ना अनेक सवाल अजित पवार यांनी राज ठाकरेंना विचारले.
रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे?
मशिद, भोंगे, हनुमान चालिसा यावरती राजकारण करू पाहणा-या राज ठाकरेंना बाकीचे प्रश्न नाहीत का? त्यावरती आंदोलन करा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. अशी भडकावू भाषणे करून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे? कोरोना काळात तरुणांचा रोजगार गेला, अशी कृत्ये करून तो रोजगार परत मिळणार आहे का? असे सवाल अजित पवार यांनी विचारले.