मुंबई : आयटीआय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेडमधून दहावीनंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे.
ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
मंत्री सामंत म्हणाले की, दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील पदविका स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. १ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदविका प्रवेशाच्या नियमावलीस मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता दहावीनंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया २ जून २०२२ रोजी सुरू करण्यात आली आहे.
पदविका प्रवेशात प्रतिवर्षी १० टक्क्यांनी वाढ
पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम इत्यादी कार्यक्रमांद्वारे पदविका अभ्यासक्रमांच्या अध्यापकांनी व संस्थांनी सकारात्मक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामुळे पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. मागील तीन वर्षांत पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशात प्रतिवर्षी सलग १० टक्के याप्रमाणे वाढ होत आहे.