पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन सचिन अहीर पुण्यात पोहचलेत. त्यांनी कलाटे यांची मनधरणी केली. शिवाय उद्धव ठाकरेही फोनवरून बोलले. मात्र, कलाटे यांनी हे दबावतंत्र फेटाळून लावत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. दरम्यान, कसब्यातून हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे कसब्यातही तिरंगी लढत होणार आहे.
राहुल कलाटे यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ, असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. कलाटे म्हणाले की, सचिन अहिर यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंशीही फोन लावून दिला. त्यांच्याशीही चर्चा केली. मी ठाकरे यांचा अनादर करणार नाही. मात्र, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीतून संभाजी ब्रिगेडने माघार घेतल्याची घोषणा केली आहे.
असे आहेत उमेदवार
विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकरआणि हिंदू महासंघाकडून आनंद दवे आणि कसब्यात अविनाश मोहिते मैदानात आहेत. संभाजी ब्रिगेडने शिवसेनेशी आघाडी केली आहे. त्यामुळे मोहिते निवडणुकीत उभे राहिल्याने शिवसेनेची गोची झाली आहे. मात्र, आता संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे रिंगणात आहे. मात्र, या ठिकाणी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे.