24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रपुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना

पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्याला करोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या लढ्याचे नेतृत्व करत असलेले पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाच आता करोनाने गाठले आहे.
मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली असून याबाबत खुद्द मोहोळ यांनीच जाहीरपणे माहिती दिली आहे. मोहोळ यांनी आज सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी एक ट्विट केलं असून त्यात आपल्याला करोना संसर्ग झाल्याचे नमूद केले आहे. थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड १९ टेस्ट केली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे मोहोळ यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

करोना झाला असला तरी यातून लवकरच बरा होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ‘माझी प्रकृती आता स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेन. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन’, अशा शब्दांत त्यांनी पुणेकरांना आश्वस्त केले आहे.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ पुण्याच्या करोना विरुद्धच्या लढाईत पहिल्यापासूनच नेतृत्व करत आहेत. पुणे पालिका हद्दीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेतले. लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, रुग्णांवरील उपचार याबाबत सरकारच्या व पालिकेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले. खुद्द उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले आहे. आता करोना संसर्ग झाल्याचे कळल्यानंतरही त्यांनी महापौर म्हणून आपल्या जबाबदारीचे भान राखले आहे. रुग्णालयात उपचार घेत असतानाही ते सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून स्थितीचा आढावा घेत राहणार आहेत.

पुण्यातील स्थिती गंभीर
पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शुक्रवारी पुणे जिल्ह्यात करोनाचे ११९९ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पुण्यातील करोना बाधितांच्या रुग्णसंख्येने २६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे तर जिल्ह्यात ८२७ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात शुक्रवारी ७६१ नवे रुग्ण आढळून आले तर आठ जणांचा मृत्यू झाला. शहरातील ३८९ रुग्ण गंभीर असून, त्यापैकी ५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पिंपरीत ३२२ करोनाबाधित आढळून आले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देहूरोड कँटोन्मेंटमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे ग्रामीण आणि पुणे कँटोन्मेंट व नगरपालिका क्षेत्रातही करोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या