पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीतूनही डझनभर इच्छुक आहेत. याची यादीच समोर आली आहे. यामुळे आता कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची यासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीत एकूण दहा इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय झाला आहे.
कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील इतर पक्षामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे, असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला, अशी माहिती सूत्रांकडून कळते.
‘हे’ आहेत राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावासह एकूण १० इच्छुकांची नावे समोर आली असून यांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत.