मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर हिणकस मजकूर प्रसारित करणारी टीव्ही मालिकांतील अभिनेत्री केतकी चितळे हिला रविवारी ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आज याच प्रकरणात ठाणे पोलिसांनी केतकीच्या नवी मुंबईमधील घरी जाऊन तपास केला. तिच्या घरून लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्यूटरसह संशयास्पद वस्तू पोलिसांनी घरातून जप्त केल्या. दरम्यान, या प्रकरणी केतकी चितळेच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आज दुपारी तीनच्या सुमारास ठाणे पोलिस केतकीला घेऊन तिच्या कळंबोली येथील घरी दाखल झाले. त्यांनी घरातील लॅपटॉपसह इतर काही वस्तू ताब्यात घेतल्या. यानंतर केतकीला घेऊन पोलिस पुन्हा ठाण्याला रवाना झाले. सुमारे एक ते दीड तास केतकीच्या घरी तपास सुरू होता. दरम्यान, मुंबईतही तिच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता.
या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती. रविवारी सकाळी तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.