मुंबई : केतकी चितळेने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या केतकी न्यायालयीन कोठडीत आहे. केतकीवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशा मागणीचा अर्ज केतकीने न्यायालयात केला आहे.
अनेक पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे, असे केतकीने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कळवा पोलिस ठाण्यासह राज्यभरातील अनेक पोलिस ठाण्यांत केतकीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.
गेल्या २३ दिवसांपासून अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी वकील घन:श्याम उपाध्याय हे कोर्टाला विनंती अर्ज देखील करणार आहेत.
१५ मे रोजी अटक
शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी १४ मे रोजी कळवा पोलिसांनी केतकीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिला १५जूनला अटक करण्यात आली होती. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर केतकी आता न्यायालयीन कोठडीत आहे.
केतकीचे म्हणणे काय..
केतकीचे असे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीने माझ्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, त्याच्या नावाचा उल्लेख सदरील फेसबुकवरील कवितेत नाही. मी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखवणारी ही पोस्ट असली तरीही कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दिलेले नाही. मग पोलिस मला अटक कशी काय करू शकतात, असा प्रश्न केतकीने विचारला आहे. पोलिस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला आहे.