30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रखडसे भाजपाला देणार मोठा दणका

खडसे भाजपाला देणार मोठा दणका

एकमत ऑनलाईन

जळगाव: भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. भाजपाच्या बहुतांश नेत्यांनी त्यात काही विशेष नसल्याचे भासवले. मात्र आता खरोखरच भाजपाची चिंता वाढणार आहे. माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत, असा दावा करीत खडसेंनी भाजप नेतृत्वापुढे मोठी भीती निर्माण केली आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला . काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण असल्याची माहिती त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर १५-१६ माजी भाजपा आमदारही उद्या माझ्यासोबत मुंबईत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला खान्देशात नेतृत्वच नसल्याने मला पक्षाचा विस्तार करण्यास मोठ्या संधी असल्योचही त्यांनी सांगितले.

फडणवीसांवर पुन्हा टीकास्त्र
खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. फडणविसांनी माझी बाजू वरिष्ठांजवळ चुकीची मांडल्याचा आरोप त्यांनी केला. राजीनामा दिल्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले की मी एकच बाजू मांडत आहे. उर्वरित बाजू ते वेळ आल्यानंतर सर्वांसमोर आणणार आहेत. पण मग गेली साडेचार वर्षे ते कुठे गेले होते. मी सातत्याने न्यायाची मागणी करत असताना, माझा गुन्हा काय, ते विचारत असताना त्यांनी चालढकल का केली? असा सवाल खडसे यांनी फडणवीसांना केला. मला न्याय मिळत नसल्यानेच मी माझ्या समर्थकांशी चर्चा करून अखेर पक्षांतर करण्याचा हा निर्णय घेतला आहे. माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार आहेत. ते उद्या मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण आहे. एवढ्या आमदारांनी राजीनामे दिले तर निवडणूक घेणे शक्य नाही, असे सूचक वक्तव्यही खडसे यांनी केले.

शिवसेना व काँग्रेसकडूनही ऑफर होती
राष्ट्रवादीला आमच्या भागात नेतृत्व नसल्यानेच मी राष्ट्रवादीची निवड केली. मला शिवसेना, काँग्रेसकडूनही ऑफर होतीच, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याबाबतीत पक्षाने घेतलेला सामूहिक निर्णय असेल म्हणून मी न्यायाची अपेक्षा करत होतो. एकेक विषयावर मी फडणवीस यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करत होतो. माझ्याबाबतीत जे काही घडले ते जनतेला माहिती आहे, असेही खडसे म्हणाले.

केवळ चंद्रकांत पाटील यांचाच फोन
साडेचार वर्षे मी पक्षाकडून न्यायाच्या अपेक्षेत होतो. पण माझी पक्षाकडून दखल घेतली गेली नाही. खोट्या केसेस माझ्यावर फडणवीसांनी दाखल करायला लावल्या. त्यात मी एकटा लढून बाहेर पडलो. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याबाबतीत वरिष्ठ लोकांकडे चुकीची माहिती सादर केली. त्यात मला न्याय मिळणार नाही, अशी खात्री झाल्यानंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केवळ चंद्रकांत पाटील यांनीच मला जाऊ नका म्हणून आवाहन केले, असे खडसे म्हणाले.

फडणवीसांमुळेच भाजपाचे सरकार आले नाही
देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचे सरकार येऊ शकले नाही, असा आरोपही पुन्हा खडसे यांनी केला. फडणवीसांनी पाच वर्षे सरकार असताना केलेले काम होते, युती होती, अशा सर्व गोष्टी उपलब्ध असताना त्यांना सरकार का आणता आले नाही? असा माझा प्रश्न आहे. माझ्यासह चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता हे नेते सातत्याने निवडून येणारे होते. यांची तिकिटे का कापली? याचेही उत्तर फडणवीसांनी का दिले नाही. फडणवीसांनी माझ्यावर खोट्या केसेस करायला मदत केली. मी केवळ आणि केवळ फडणवीसांमुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असा पुनरूच्चार खडसे यांनी केला. पक्षाला मोठे करण्यात थोडा का होईना आमचाही वाटा होताच. मात्र, आम्हाला का बाजूला सारण्यात आले. अशा पद्धतीने पक्ष सोडावा लागला; आता तरी तुम्ही चिंतन करणार आहात की नाही? असा टोलाही त्यांनी शेवटी फडणवीसांना लगावला.

घारी गावच्या झोंबाडे कुटुंबियांसाठी डीवायएसपी व तहसील कार्यालयावर मातंग समाजाचा मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या