19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रतीन मित्रांनी मिळून उभारले कोविड हॉस्पिटल

तीन मित्रांनी मिळून उभारले कोविड हॉस्पिटल

एकमत ऑनलाईन

सांगली : मित्राच्या आईला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात खाटांची उपलब्धता नसल्याने वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. जुजबी उपचारांवरच समाधान मानावे लागल्याने तिने मिरजेतील सरकारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उपचाराविना मित्राला आई गमवावी लागल्याचे दु:ख पचवत तीन मित्र एकत्र आले. अशी वेळ इतरांवर येऊ नये यासाठी त्यांनी मिरज येथे आरफा हेल्थकेअर कोविड हॉस्पिटल सुरू केले.

सेवाभावी वृत्तीतून सुरू केलेले हे हॉस्पिटल मिरजेतील गरजूंसाठी आधार बनले आहे. गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला होता. रुग्णालयांमध्ये खाटांची उपलब्धता नसल्याने अनेक रुग्णांवर घरीच उपचार करावे लागले. खासगी आणि सहकारी रुग्णालयांमध्ये पुरेशा ऑक्सिजनयुक्त खाटा आणि व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागले. असाच प्रसंग मिरज येथील शकील पिरजादे यांच्यावर ओढवला. पिरजादे यांचे मित्र जमीर सनदी आणि मौलाना मुबारक हे आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी धडपडत होते. सांगली आणि मिरजेतील जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये विनंती करूनही आईसाठी खाट उपलब्ध झाली नाही. अखेर मिरजेतील सरकारी रुग्णालयात प्रवेश मिळाला, पण खूपच उशीर झाला होता.

योग्य वेळी उपचार न मिळाल्याने पिरजादे यांच्या आईचा मृत्यू झाला. उपचाराअभावी आईचा मृत्यू झाल्याने हे तिन्ही मित्र अस्वस्थ होते. आपल्यासारखीच अवस्था अनेकांची असल्याने गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तीन मित्रांनी एकत्र येऊन ‘हयात फाऊंडेशन’ आणि ‘जमियत-ए-दर्दमंदाने इन्सानियत’ या संस्थांच्या मदतीने आरफाहेल्थकेअर कोविड हॉस्पिटल सुरू केले. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी हॉस्पिटल सुरू करण्याची परवानगी दिली. ऑक्सिजनयुक्त ४० खाटांचे हॉस्पिटल सुरू केले. तसेच दोन मिनी व्हेंटिलेटरही उपलब्ध केले. या हॉस्पिटलमध्ये १४ डॉक्टर, २२ नर्सिंग स्टाफ आणि १२ स्वच्छता कर्मचारी आहेत. गेल्या १५ दिवसांत ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर सध्या १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हैदराबादने गुणांचा भोपळा फोडला

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या