अमरावती : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने हनुमान चालिसा प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
या प्रकरणावरून संतप्त झालेले शिवसैनिक हे राणा यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तसेच त्याठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. राणा यांची मातोश्रीवर जाण्याची हिंमत नाही. त्यांनी आधी अमरावतीच्या शिवसैनिकांना ऐकून घ्यावे, असा इशाराही अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी दिला आहे. तर या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य यांच्या घरासमोर व कार्यालयासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.
सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा व भोंगा यावरून मोठा वाद सुरू असताना या वादामध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचणार, असा इशाराचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला होता.