सातारा : औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वाद आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या धमकीनंतर सातारा जिल्ह्यातील अफझलखानच्या कबरीभोवतालची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहे.
अफझलखानाची कबर महाबळेश्वरजवळ प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. ओवेसी नेते असदुद्दीन ओवैसी यांनी नुकतेच खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेब यांच्या समाधीला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. ओवैसी यांच्या या कृत्यानंतर मनसेकडून याचा निषेध करण्यात आला. तसेच या कृतीप्रकरणी राज्य सरकारला ओवेसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, जर सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर, मनसेकडून यावर योग्य ते पाउल उचलेले जाईल.
नुकतीच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफझलखानाचा वध केला. त्याच्या समाधी स्थळावर विशिष्ट समाजातील लोकांकडून पुष्पहार अर्पण केले जात आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असून, यावर राज्य सरकारकडून योग्य ते पाउलं उचलण्यात न आल्यास मनसेकडून योग्य ती कारावाई केली जाईल असा इशारा राज यांनी दिला आहे.