लातूर : मृग नक्षत्र सुरु होऊन आठ दिवसानंतरही जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र, मंगळवार, दि. १४ जून रोजी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने लातूर शहरात हजेरी लावली.
तासभर पडलेल्या पावसाने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच जोरदार पाऊस पडून पेरण्यांना सुरुवात होईल, असे शेतक-यांना वाटत आहे. दरम्यान, यंदा जूनमध्ये आतापर्यंत जिल्ह्यात २८.६ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
यंदाच्या जूनमध्ये आतापर्यंत अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ५७.३ मिलीमीटर तर निलंगा तालुक्यात सर्वात कमी १३.३ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. लातूर तालुक्यात १६.७ मिलीमीटर, औसा २०.९, उदगीर ४४.६, चाकुर ३६.७, रेणापूर १४.३, देवणी २५.०, शिरुर अनंतपाळ २५.८ तर जळकोट तालुक्यात ५६.५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.