36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रनगरपंचायतीत आघाडीची सरशी

नगरपंचायतीत आघाडीची सरशी

आघाडीला ९७६ जागा, भाजप सर्वांत मोठा पक्ष, राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरपंचायतवर वर्चस्व

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर बुधवारी निकाल जाहीर झाला. महाविकास आघाडीने काही ठिकाणी आघाडी, तर अनेक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली आणि सर्वाधिक ९७६ जागांवर विजय मिळविला, तर पक्षीय पातळीवर भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपने सर्वाधिक ४१६ जागांवर विजय मिळविला, तर राष्ट्रवादीला ३७८, शिवसेनेला ३०१ आणि कॉंग्रेसला २९७ जागा मिळाल्या. दरम्यान आणखी ९ नगरपंचायतींचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.

राज्यातील १०६ नगर पंचायतीपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. ९७ नगर पंचायतीपैकी सर्वाधिक २५ नगर पंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. त्यानंतर भाजपने २४ नगरपंचायतीवर वर्चस्व मिळविले आणि पक्षीय पातळीवर सर्वाधिक ४१६ जागा जिंकत सर्वांत मोठा पक्ष म्हणून यश मिळविले. राष्ट्रवादीने ३८७ जागा मिळवत दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसने १८ नगरपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करीत २९७ जागा आणि शिवसेनेने १४ नगरपंचायती आणि ३०१ जागा मिळवल्या आहेत. आघाडीचा विचार केल्यास महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरपंचायती आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला, तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके, रोहित पवार यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले. नितेश राणेदेखील आपला गड राखण्यात यशस्वी ठरले. अमरावतीत यशोमती ठाकूर, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनीही अनुक्रमे अमरावती, नांदेड जिल्ह्यात आपला प्रभाव दाखवून दिला. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला, तर रोहित पवार, आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करीत यश मिळविले.

रोहित पाटीलवर कौतुकाचा वर्षाव
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील या नवतरुण नेत्याचा कवठेमहांकाळ नगर पंचायतीत कस लागला होता. कारण सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध रोहित पाटील असे चित्र होते. त्यात रोहित पाटील यांनी बाजी मारत कवठेमहांकाळ येथे एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे या तरुण नेत्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या