पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरु करण्याची घोषणा आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्याचा २०२३-२४ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. जुन्नरच्या बिबट सफारीवरुन मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. बिबट सफारी जुन्नरमध्ये होणार की बारामतीत होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता बिबट सफारी जुन्नरमध्येच होणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे.
बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. मात्र त्यानंतर जुन्नरचे राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके यांनी विरोध केला होता. त्यानंतर बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी १०० हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास ६० कोटी रुपयांची तरतूद केली होती.