मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) पोलीस भरतीत मराठा समाजातील उमेदवारांसाठी १३ टक्के जागा बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासले जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. राज्य सरकारचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी पोलिस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमिवर शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा रिक्त ठेवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीत मराठा उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा. त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन नंतर भरुन टाका, अशी सूचना मेटे यांनी केली आहे.
मराठा समाजातील तरुण-तरुणींना भरतीत सामावून करुन घेतले तरच हे सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे असे म्हणता येईल. अन्यथा सरकारला संतापाची प्रतिक्रिया रस्त्यावर पहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला आहे. मुलांच्या मागणीला प्रतिसाद देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासून पाहिले जाईल, असे सांगितले.