मुंबई : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छत्रपती घराण्याच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करणा-या संभाजीराजे यांची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका वक्तव्यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. उमेदवारीचे तिकिट आणि छत्रपती घराण्याचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडणे गैर आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
छत्रपती घराण्याला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती छत्रपती घराण्याचा सन्मान करते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
उमेदवारीचे तिकिट आणि छत्रपतींचा सन्मान या गोष्टी जोडायची गरज नाही. तिकिट हा वेगळा भाग आहे. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याविषयी प्रेमच आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.
संभाजीराजे छत्रपती नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. आमच्यात बोलणं झालं आहे. पुढे काय करायचे तेदेखील ठरले आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणेच वागतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.