28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeमहाराष्ट्रपोटनिवडणुकीत कमी मतदान, उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

पोटनिवडणुकीत कमी मतदान, उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

एकमत ऑनलाईन

पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. मतदारांनी सकाळपासून मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

मात्र, त्यानंतर मतदारांत म्हणावा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. कारण कसब्यात केवळ ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये फक्त ४१.१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. आता २ मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत झाली, तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत झाली. यांच्यासह सर्वच उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. उमेदवारांसह मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहेत.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत दिग्गजांची शक्ती पणाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक प्रचारात भाग घेतला होता.

किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत
मतदानादरम्यान चिंचवडमध्ये एका मतदान केंद्रावर माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक आपापसांत भिडले. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली. आणखी एका ठिकाणी ईव्हीएम मशिन बिघडल्याने मतदान प्रक्रिया थांबवावी लागली होती. मात्र, त्यानंतर मशिन दुरुस्त होताच मतदान सुरू झाले. असे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

 

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या