25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला कोरोना लसीचे अपेक्षेपेक्षा कमी डोस - राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्राला कोरोना लसीचे अपेक्षेपेक्षा कमी डोस – राजेश टोपे यांची माहिती

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१३ (प्रतिनिधी) १६ जानेवारीपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम सुरु होणार असून, राज्यांना लसीचे वितरणही सुरु झाले आहे. मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात १७ लाख ५० हजार कुप्यांची गरज असताना प्रत्यक्षात ९ लाख ६३ हजार डोस मिळाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेवरून लसीकरण केंद्राची संख्या कमी करून ५११ ऐवजी ३५८ करण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. मात्र हे डोस सुरक्षित असून ते सर्वांनी घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

१६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रात दोन ठिकाणी पंतप्रधानांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील कूपर रुग्णालय आणि दुसरे जालन्यातील जिल्हा रुग्णालय येथून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्रात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात लसीकरणाचा तयारी करताना यापूर्वी ५११ केंद्रांवर नियोजन केले होते. पण मंगळवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये रूग्णालयातील इतर गोष्टीही सुरु राहाव्यात याकरिता केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका असे सांगितले. त्यामुळे ५११ वरुन ही संख्या ३५८ केली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे,” असे टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्राला केंद्र सरकारने एकूण ९ लाख ६३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. पण बफर स्टॉकसहित हे डोस १७.५० लाख हवे होते. आज त्यापैकी साडे नऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. म्हणजेच आठ लाख लोकांना लसीकरण करणार त्याच्या ५५ टक्के म्हणजेच आज जे डोस उपलब्ध झाले आहेत त्याअनुषंगाने साधारण पाच लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसींचे वाटप केले जात असून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात ९ लाख ६३ हजार लसींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात ९ हजार डोस, अमरावतीसाठी १७ हजार, औरंगाबाद-३४ हजार, बीड-१८ हजार, बुलढाणा-१९ हजार, धुळे-१२ हजार ५००, गडचिरोली १२ हजार, गोंदिया १० हजार, हिंगाली ६ हजार ५००, जळगाव-२४ हजार ५००, लातूर-२१ हजार, नागपूर-४२ हजार, नांदेड-१७ हजार, नंदुरबार-१२ हजार ५००, नाशिक-४३ हजार ५००, मुंबई-१ लाख ३९ हजार ५००, उस्मानाबाद-१० हजार, परभणी-९ हजार ५००, पुणे-१ लाख १३ हजार, रत्नागिरी-१६ हजार, सांगली-३२ हजार, सातारा-३० हजार, सिंधुदुर्ग-१० हजार ५०० सोलापूर-३४ हजार, वर्धा-२० हजार ५००, यवतमाळ-१८ हजार ५००, अहमदनगर-३९ हजार, भंडारा-९ हजार ५००, चंद्रपूर-२० हजार, जालना-१४ हजार ५००, कोल्हापूर-३७ हजार ५००, पालघर-१९ हजार ५००, रायगड-९ हजार ५००, ठाणे-७४ हजार, वाशिम-६ हजार ५०० अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण केंद्र
राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (५०) असून त्या पाठोपाठ पुणे (३९) ठाणे (२९) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी १ लाख ३९ हजार ५०० तर पुण्यासाठी १ लाख १३ हजार डोसेस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, आता राज्‍य मानवी हक्‍क आयोगाच्या आयुक्तपदाची जबाबदारी !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या