25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा औषध पुरवठा रोखला? नवाब मलिक यांचा आरोप; भाजपचे प्रत्युत्तर

महाराष्ट्राचा औषध पुरवठा रोखला? नवाब मलिक यांचा आरोप; भाजपचे प्रत्युत्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे रूग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार यासाठी वारंवार केंद्राकडे पुरवठ्याची मागणी करत आहे. मात्र केंद्र मदतीस तयार नसून, केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीर औषध पुरवठा करू नये, केल्यास कारवाई करू, असे राज्यातील औषध कंपन्यांना ठणकावल्याचा गंभीर आरोप शनिवार दि़ १७ एप्रिल रोजी पत्रकारपरिषदेत राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने धडकले आहे़

महाराष्ट्र सरकारला एक्सपोर्ट कंपन्या थेट रेमेडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार होते, पण त्यांना केंद्राने रोखल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे़ रेमडेसीवीर इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा पाहता केंद्र सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे १६ निर्यातदार कंपन्यांकडे जवळपास २० लाख रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होते. हे इंजेक्शन मिळण्यासाठी राज्य सरकारने या कंपन्यांशी संपर्क केला होता. केंद्र सरकारने या कंपन्यांना महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन देण्यास नकार दिल्याचे मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.एवढेच नाहीतर, ज्या कंपन्यांनी महाराष्ट्राला याचा पुरवठा केला तर त्यांच्यावर परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे़

तर औषध साठा जप्त करू
केंद्राने औषध कंपन्यांना महाराष्ट्रात औषध पुरवठा करण्यास रोखले तर राज्य सरकार संबंधीत औषध साठा जप्त करू, विक्री करण्यास केंद्राने निर्बंध लावल्यास आम्ही ही सगळी औषधे जी महाराष्ट्रात आहेत, निश्चितरूपाने एफडीएच्या मंत्र्यांच्या माध्यमातून तो विभाग सीझ करेल व जनतेला वाटप करण्याचे काम केले जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचा इशारा यावेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे़

राज्याला सावत्र आईची वागणूक
नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्र शेअर केले आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक मिळत असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. केवळ गुजरात राज्यालाच रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करणा-या निर्यात कंपनीला मंजुरी देण्यात आल्याचे हे पत्र असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे़ दरम्यान, या पत्रावर गुजरातच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांची सही आहे.

मलिक अर्ध सत्य बोलतायेत : केंद्र
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी केलेले ट्वीट धक्कादायक आणि खोटे आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही अर्ध सत्य आणि खोटी आहे. सरकारच्या नोंदीनुसार ईओयूचे केवळ एक युनिट आहे आणि सेझमध्ये एक आहे. आम्ही कोणताही रेमडेसिवीरचा साठा अडवला नाही़ आपण सांगितलेल्या या १६ कंपन्यांची यादी, स्टॉकची उपलब्धतेची माहिती सादर करा. केंद्र सरकार लोकांच्या मदतीसाठी सर्व काही करण्यास वचनबद्ध आहे, असे मांडवीय यांनी म्हटले़

खोटारडेपणाचा कळस : भाजप
नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट प्रत्युत्तर देत नवाब मलिक यांना आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करत म्हटले की, नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का? माझे त्यांना आव्हान आहे, आपले म्हणणे सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा. नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे खोटारडेपणा आणि बेशरमपणाचा कळस आहे. नवाब मलिक यांनी या आरोपाचे पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.

पंजाबमध्ये एमएसपीची रक्कम बँक खात्यात जमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या