बारामती : आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाव्यात की नाही या बाबतचा निर्णय सोमवारी एकत्र बसून घेतला जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस १५ वर्षांपासून एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यावा हा अधिकार जिल्हा स्तरावर द्यायचो, प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती व कार्यकर्त्यांचे म्हणणे वेगळे असते, तरीही राज्यस्तरावर जो निर्णय घेतला जाईल तो संबंधितांना कळविला जाईल.
निवडणूक आयोगाने निवडणुका जाहिर केल्यामुळे त्याला सामोरे जावे लागणार आहे, सध्या कोकणात पाऊस सुरु आहे, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आता निवडणुका जाहिर झाल्यामुळे सर्वांपुढे पर्याय नाही, न्यायालयात जाऊ शकतात पण एकदा निवडणूक जाहिर झाल्यानंतर न्यायालय त्यात बदल करत नाही, असा अनुभव आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा झाल्याची माहिती आहे, मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळायला हवे अशी सर्वांचीच भूमिका आहे, ओबीसी वर्गाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी अशी आमची भूमिका आहे.