19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रसावंत यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक

सावंत यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठा आरक्षणावरुन आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर माफी मागितली आहे. तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागतो असे म्हटले. सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का? असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आणि सावंत यांना माफी मागा अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा दिल्यानंतर तानाजी सावंत यांनी जर माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो असे म्हणत केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षण मिळाले त्यानुसार अनेकांना नोक-या मिळाल्या. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असताना सहा महिन्यात आरक्षण रद्द करण्यात आले. त्यावेळी रद्द झालेल्या आरक्षणावर कोणीही मोर्चा काढला नाही, आंदोलनाची भाषा केली नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांशी आमच्या चर्चा सुरु होत्या. आरक्षण मिळवण्यासाठी काय करायला हवे? याचा विचार करत होतो. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यावरच यांनी आंदोलनाची भाषा सुरु केली. यामागे कोणाचा हात आहे हे सगळ्यांना माहित आहे, असा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केला आहे.

सावंत यांना समज द्या : विनोद पाटील
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ सावंत यांना समज द्यावी अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. तानाजी सावंत यांनी एक आगळवेगळ वक्तव्य केले असून, त्याचा मी निषेध करतो. मागच्या काळात जेव्हा त्यांना मंत्री व्हायचे होते, त्यावेळी हेच मराठा कार्यकर्ते त्यांच्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जात होते. याचा त्यांना विसर पडला आहे का?,.. त्यामुळे कुणाच्या ताकदीवर कोणत्या गैरसमजुतीतून सावंत यांनी हे विधान केले आहे. सावंत यांचे विधान अतिशय खालच्या दर्जेचं असल्याचे विनोद पाटील म्हणाले.

सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : नाना पटोले
तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणा-या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या