22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यातील सर्व कार्यालयांत मास्कसक्ती

राज्यातील सर्व कार्यालयांत मास्कसक्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने आज नवा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबतही या आदेशात महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अर्थचक्राला गती देण्यासाठी बहुतेक सर्वच आस्थापना आणि व्यवहार आता सुरू झाले आहेत. असे असताना कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करताना तितकीच दक्षता घेण्याचेही सरकारने ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यालयात मास्कसक्तीबाबत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

त्यानुसार राज्यातील मंत्रालय, अधिनस्त कार्यालये, विधानभवनासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणा-या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात मास्क वापरणे बंधनकारक राहील. या कार्यालयांत काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांनी दोन्ही डोस घेतले आहेत का, याची खातरजमा करावी. तसेच लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचा-यांकडून घ्यावे. मास्कचा सुयोग्य वापर आणि लसीकरणासंबंधी विभाग प्रमुख वा कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा अधिका-याला नामनिर्देशित करावे.

सर्व कार्यालयांत मास्क अनिवार्य असल्याने कर्मचारी, अधिकारी किंवा अभ्यागत हे कार्यालयात किंवा आवारात विनामास्क आढळल्यास संबंधित नामनिर्देशित अधिका-याला नियम मोडणा-याकडून दंड वसुलीचे अधिकार असतील. दंड आकारणी केल्यावर त्याची पावती दिली जाईल. ती रक्कम कार्यालयातील संबंधित अधिका-यांकडे जमा होईल व तिथून महसुलात जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या