24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमाउलीच्या पालखीचे रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे रिंगण आणि बंधुभेट

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो.

तत्पूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले. माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली, टाळ, मृदंगाचा जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.

या दोन पालख्या एकमेकाना भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानक-यांना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कमी पोहचली.

जगद्गुरू संत तुकारम महाराज यांची पालखी बोरगाव येथून मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा… आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढपूर तालुक्यात आगमने झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांत काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी स्वागत केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या