26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रसर्वच पक्षांच्या जोरबैठका

सर्वच पक्षांच्या जोरबैठका

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्यसभेप्रमाणे गडबड होऊ नये, म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते योग्य ती खबरदारी घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपनेही महाविकास आघाडीला पुन्हा धक्का देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, दोघांसाठी अपक्ष आणि छोटे पक्ष फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करतानाच आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छोटे पक्ष, अपक्ष आमदारांच्या भेटीसोबतच महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेसोबतच भाजपनेही आज बैठकांचा धडाका सुरू केला. भाजपने ताजमध्ये उपस्थित सर्व आमदारांची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात रणनीतीवर चर्चा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्रायडंट हॉटेलवर सायंकाळी बैठक घेतली.

या बैठकीला खुद्द शरद पवार उपस्थित होते. त्यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. कॉंग्रेसनेही फोर सिझन हॉटेलमध्ये सर्व आमदारांची बैठक घेतली. यावेळी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिवसेनेचे आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये असून, तिथेही आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. उद्या दुपारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

चमत्कार कोण करतेय दिसेलच : अजित पवार
विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून, २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली. तसेच, चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल, असे विधानही यावेळी त्यांनी केले.

फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची लढत
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी सर्व आमदारांना कामाला लावले आहे. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणीस यांचे निकटवर्तीय नेते आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा फडणवीसांसाठी महत्त्वाचा आहे. यात भाई जगताप पुन्हा लाड यांना हरवण्यात यशस्वी होतात, की भाजपचे प्रसाद लाड मागील पराभवाचा बदला घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदारांना केंद्रीय यंत्रणांच्या धमक्या: पटोले यांचा आरोप
आघाडीच्या आमदारांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून धमकावले जात असून याची ध्वनिफीत आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनीही अशाच स्वरूपाचा आरोप केला, तर भाजपाने हे आरोप म्हणजे २० तारखेला होणा-या पराभवाची तयारी असल्याचा पलटवार केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या