नाशिक : सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर येथे काही दिवसांपूर्वी हादरे, भूगर्भातून आवाज येण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पेठ, त्र्यंबक तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ तालुक्यात पावसामुळे अनेक भागात जमीन खचली, रस्त्यांना डोंगरांना भेगा गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढी, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा, खैराईपाली या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता २.४ रिश्टर स्केल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दुपारी बाराच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जमिनीला हादरे बसल्याचे, तसेच भिंती, दरवाजे, खिडक्यांची तावदाने हलल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीला साधारणत: एक ते दीड या कालावधीत जमीन हादरली. दरम्यान हे धक्के दि. २१ जुलै व २२ जुलै या दिवशी बसले आहेत. यामध्ये पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढी, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैराईपाली या गावांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.