सातारा : किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत १९ वर्षांनंतर सत्तापरिवर्तन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनलने सर्व २१ जागा जिंकत सत्ता काबीज केली होती.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनल विरुध्द माजी आमदार, भाजपा नेते मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनल अशी चुरशीची लढत झाली.
या निवडणुकीत मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शेतकरी विकास पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. २१ जागांसाठी ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय चार अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.