मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसेतर्फे आज दादर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मनसे पदाधिकारी व मनसेच्या जनहित कक्षाच्या वकिलांनी ही तक्रार दाखल केली.
बृजभूषण सिंह सातत्याने राज ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वकिलांनी केली आहे.
दरम्यान, आम्ही दिलेल्या तक्रार अर्जावर संपूर्ण चौकशी करून पुढील कारवाईची प्रक्रिया करू, असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती मनसे पदाधिका-यांनी दिली आहे. बृजभूषण हे सातत्याने राज ठाकरेंविरोधात चिथावणीखोर वकतव्य करून कार्यकर्त्यांना भडकावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेने तक्रार अर्जात केली आहे.