26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रअंदमाननंतर मान्सून बंगालच्या उपसागरात

अंदमाननंतर मान्सून बंगालच्या उपसागरात

एकमत ऑनलाईन

मुंबई : उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढत असताना आता दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वा-याचे आगमग होत आहे. अंदमाननंतर आता नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनची भारताकडे वेगाने आगेकूच होत आहे. येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून धडकणार आहे. दरम्यान, राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र, विदर्भातील काही भागात उन्हाचा तडाखा कायम राहणार असून तापमानाचा पारा चढाच राहणार आहे.

मान्सून आज अंदमाननंतर बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. अर्थात, नैऋत्य मोसमी वा-याच्या हालचालीसाठी दक्षिण भारतात पोषक हवामान निर्माण झाले आहे. अंदमान निकोबार बेटांवरील बहुतांशी ठिकाणी नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता दक्षिण बंगालच्या उपसागरातदेखील मान्सून धडकला आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच मान्सून केरळमध्ये तो २७ मेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान तयार होत आहे. या राज्यांत अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे.

महाराष्ट्रात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय विदर्भातही ढगाळ वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

मराठवाड्यासह राज्यातील ९ जिल्ह्यांत येलो अलर्ट
हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

अमरावती, अकोल्यात उष्णतेची लाट कायम
दरम्यान, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. अकोला जिल्ह्यात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र उष्णतेची दाहकता कमी झाली असून तापमानाचा पारा किंचित घसरला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

यंदा जोरदार बरसणार
स्कायमेट व भारतीय हवामान विभागानेदेखील यंदा मान्सून जोरदार होण्याचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानेही ९९ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कमी-जास्त पावसाचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो, कारण मान्सूनच्या परिस्थितीवरुन दुष्काळ असेल की पूर येईल, याचा अंदाज वर्तवला जातो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या