22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमान्सूनचा बुधवारपासून परतीचा प्रवास!

मान्सूनचा बुधवारपासून परतीचा प्रवास!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात बुधवारपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार असून, प्रमुख धरणातून विसर्गदेखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. २१ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहणार आहे. भारताच्या वायव्य भागात पश्चिम राजस्थानातील श्रीगंगानगर, बिकानेर, जोधपूर, जैसलमेर, बारमेर, झालोर यासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, सौराष्ट्रातील कच्छचे रण या भागात वातावरणात बदल झाला आहे.

जमिनीलगत उच्च दाब तयार झाला असून त्यातून घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणा-या प्रत्यावर्ती चक्रीय वा-याच्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत कधीही या भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.राज्यात २१ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहणार आहे.

कोकण वगळता महाराष्ट्रात गुरुवार, दि. २२ सप्टेंबरपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असून नाशिक, माथेरान, डहाणू, महाबळेश्वर या ठिकाणी पावसाची दिवसभर रिपरिप सुरू होती, तर काही भागात ढगाळ वातावरण होते. रविवारी नाशिक आणि माथेरान या ठिकाणी दिवसभर पाऊस झाला.

मराठवाड्यात ढगाळ वातावरण
औरंगाबादसह जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी या भागात सकाळपासूनच सुर्यदर्शन झालेले नाही. सकाळपासून आज सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळाले, तर रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरसह वैजापूर तालुक्यात पावसाने धुवाधार बॅटींग केली. तसेच सोमवारीही कन्नड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला.

मनमाडमध्ये पूर!
मनमाडसह परिसराला पावसाने रविवारी चांगलंच झोडपले. जोरदार पावसामुळे शहरातून वाहणा-या रामगुळणा-पांझण नदीला मोठा पूर आला असून शहरातील दोन भागांना जोडणारे अनेक पुल पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. काही घरांना पूराच्या पाण्याचा फटका बसला तर पुराच्या भीतीने नदीकाठच्या नागरिकांनी रात्र जागून काढली.

नदीकाठी राहणा-या गुरुद्वारमागील घरात पाणी शिरले होते. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना गुरुद्वारामध्ये आसरा देण्यात आला होता. तर गवळीवाड्यातील अनेक गोठ्यामध्ये पुराचे पाणी आल्याने गोठ्यात बांधलेल्या म्हशी इतरत्र हलवाव्या लागल्या. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगरपालिकेने दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या