कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवाडी शेअर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली
मुंबई – कोरोनाचे संकट हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवाडी शेअर करत फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Read More औरंगाबाद जिल्ह्यात 22 मे पासून रेड आणि नॉन रेडझोन असे दोेन भाग असणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. त्यावेळी, फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात दिसून येतात. ही संख्या दररोज वाढतच आहे. अनेक लोकांना उपचार मिळत नाहीत. कोणत्या रूग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची कुठलीही माहिती दिली जात नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. भाजपाकडून २२ मे रोजी हे आंदोलन करण्यात येत आहे. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. फडणवीस यांनी आकडेवारी खालीलप्रमाणे जाहीर केली आहे.
18 मे रोजीपर्यंत एकूण झालेल्या चाचण्या व त्यातील किती रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्याचा तक्ता:
भारत:4.17%
(एकूण चाचण्या:23,02,792/पॉझिटिव्ह रूग्ण:96,169)
महाराष्ट्र:12.43%
(एकूण चाचण्या:2,82,000/पॉझिटिव्ह रूग्ण:35,058)
मुंबई:13.17%
(एकूण चाचण्या:1,62,000/पॉझिटिव्ह रूग्ण : 21,335)
या स्थितीत मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. मुंबईत दिवसाला 10 हजार चाचणीची क्षमता असताना प्रत्यक्षात मात्र दिवसाला चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. हे संकट पूर्णत: ओळखल्याशिवाय आणि ते हाताळण्यास सज्ज झाल्याशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकणार नाही. केवळ अधिक चाचण्या केल्याचा दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कितीही मोठे पॅकेज दिले, तरी राज्य सरकार केंद्राकडेच बोट दाखविते आहे. इतरांनी सूचना केल्या तर ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना केल्या की, लगेच राजकारणाचा आरोप केला जातो, असेही भाजपाने म्हटले आहे.