21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रपरिवहन महामंडळातील महिला वाहकांची आई; शीलाताई नाईकवाडे

परिवहन महामंडळातील महिला वाहकांची आई; शीलाताई नाईकवाडे

एकमत ऑनलाईन

राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनेच्या पहिल्या महिला विभागीय सचिव होण्याचा मान मिळालेल्या सौ. शिलाताई नाईकवाडे स्वेच्छानिवृत्त होत आहेत. परिवहन महामंडळात कार्य करतांना त्यांनी विशेष करुन पुढाकार घेत महिलांचे प्रश्न सोडविले. महिला वाहकांचे गर्भपात होवू नये सुरक्षित मातृत्वासाठी दोन महिन्याची अतिरिक्त रजा मंजूर करुन घेतली. तसेच निर्भया परिक्रमा करुन केवळ महामंडळांतर्गत नव्हे तर महिला कर्मचार्यांंचे कौटोंबिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार्या सौ. शीलाताई संजय नाईकवाडे काही कौटुंबिक कारणास्तव राज्य परिवहन सेवेतून लेखाकार या पदावरुन स्वेच्छानिवृत्त होत असून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

सौ. शीला संजय नाईकवाडे यांनी 1988 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर 1989 मध्ये त्या लिपिक पदावर रुजू झाल्या. त्यांचे वडील माणिकराव राजाराम कदम हे एसटी महामंडळातच चालक या पदापासून वाहतूक निरीक्षक या पदापर्यंत कार्यरत होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राप महामंडळामध्ये शीलाताई नाईकवाडे यांचे कामकाज सुरू झाले.

1995 पासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले, व सक्रिय कामकाजास सुरुवात केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेत काम करताना सर्वप्रथम त्यांनी नांदेड विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या अध्यक्षपदापासून कामकाजास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. विभागीय कार्याध्यक्ष, केंद्रीय उपाध्यक्ष, राज्य महिला संघटक या पदावर त्यांनी यशस्वी कामकाज केले. महाराष्ट्रामधील पहिली महिला विभागीय सचिव होण्याचा मान त्यांना मिळाला नांदेड विभागात दोन वर्षे त्यांनी विभागिय सचिव म्हणून कामकाज केले. नांदेड विभागात राज्य परिवहन महामंडळात काम करणार्या सर्व महिलांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून त्यांनी स्वयंसिद्धा या व्यासपीठाची स्थापना केली व त्या अंतर्गत नांदेड विभागातील महिलांचे संघटन उत्कृष्टरित्या बांधले.

2000 मध्ये जयपूर येथे झालेल्या आयटीएफच्या कार्यशाळेत त्यांनी भाग घेतला व या ठिकाणी एसटी महामंडळातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. आय टी एफ या जागतिक संघटनेने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण वाढवून त्यांना देश-विदेशातील अनेक कार्यशाळा, सेमिनार, परिसंवादात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. भारतामधील अनेक राज्यांमध्ये व जागतिक पातळीवर 17 देशांमध्ये भारतीय महिला कामगारांचे प्रतिनिधित्व करण्याचे काम शीलाताई नाईकवाडे यांनी केले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मधील महिलांचे संघटन मजबूत व्हावे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी आयटीएफच्या सहकार्याने अनेक प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, मेळावे याचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले.

आयटीएफच्या 2016 साली बल्गेरिया येथे झालेल्या काँग्रेसमध्ये अशियन पॅसिफिक देशांतर्फे आंतरराष्ट्रीय महिला सामिती सदस्य म्हणून शीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामाची दखल घेऊन 2020 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या आयटीएफच्या काँग्रेसमध्ये परत चार वर्षासाठी त्यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन(खङज) या आंतरराष्ट्रीय कामगार पातळीवर दोन वेळेस स्वित्जरलँड येथील जिनिव्हा येथे त्यांनी महिला कामगार प्रतिनिधी म्हणून सहभाग नोंदविला. लंडन येथे हवार्ड युनिव्हर्सिटी तर्फे त्यांनी प्रशिक्षण घेतले व त्याचे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले. त्याचबरोबर कॅनडाच्या युनिफॉर या संस्थेसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

स्वीडनच्या युनियन टू युनियन या मान्यवर संस्थेसोबत त्यांनी स्टॉकहोम येथे आणि भारतामध्ये काम केले. सन 2002 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला. तसेच साहित्यक्षेत्रात पण शीलाताईने त्यांची चुणुक दाखवली. सन 2000 साली अकोला येथे झालेल्या कामगार साहित्य संमेलनात त्यांना उत्कृष्ट कवितेचा पुरस्कार प्रसिद्ध कवि विठ्ठल वाघ यांच्या हस्ते प्राप्त झाला. अनेक सन्माननिय पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. नांदेड महिला भूषण पुरस्कार, नेहरू युवा केंद्रातर्फे सन्मानपत्र ,राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार व इतर अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. अनेक नामांकित वर्तमानपत्रात त्यांच्या कार्याबद्दल अनेक लेख छापून आले. नांदेड जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाचे भरीव काम त्यांनी केले आहे. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 250 महिला बचत गट स्थापन केले व महिलांसाठी उद्योजक मेळावे, खाद्ययात्रा, हस्तकला प्रदर्शन यासारखे अनेक उपक्रम त्यांनी बचत गटाचे काम करताना नांदेड जिल्ह्यात राबवले.

नांदेड कामगार कल्याण मंडळावर सल्लागार सदस्य म्हणून त्यांची दोन वर्षासाठी निवड झाली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमध्ये महिलांचे संघटन उभे करून महिलांची चळवळ अधिक तीव्र केली. महाराष्ट्र एस टी कामगार संघटना अंतर्गत महिला चळवळीला निर्भया असे सार्थ नाव घेऊन त्यांनी आगारा आगारात व विभागा विभागात अनेक सक्षम सक्रिय निर्भयांचे जाळे उभे केले. सन 2015 साली संघटनेकडे महिलांसाठी हक्काच्या आरक्षणाचे मागणी करून महिलांसाठी आरक्षण मिळवून घेतले. 2018 साली संपूर्ण महाराष्ट्रात महिला वाहकांच्या गर्भपाता बाबत व इतर प्रश्नाबाबत विभागवार दौरे करून त्यांनी महिला गर्भपाताचा विषयावर प्रकाश टाकला. तात्कालीन महामंडळाचे अध्यक्ष व प्रशासनाचा रोष पत्करूनही त्यांनी या लढ्यापासून एक पाऊल पण मागे हटल्या नाहीत.

अनेक महिला वाहकाने गर्भपाताच्या विषयावर परखड मते मांडली. प्रसारमाध्यमांने या विषयाला प्रसिद्धी दिल्यामुळे आणि सर्व महाराष्ट्रातून महिलांनी आवाज उठविला मुळे शीलाताईंच्या महिला वाहकाच्या गर्भपाताच्या लढ्याला यश मिळाले. 2018साली महिला वाहकांचे गर्भपात होऊ नयेत व सुरक्षित मातृत्वासाठी त्यांना अतिरिक्त दोन महिन्यांची पगारी रजा देण्यात निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला. हा महिला चळवळीचा ऐतिहासिक विजय होता. सन 2019 मध्ये निर्भया परिक्रमेचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात महिलांनी महिलांच्या प्रश्नासाठी केलेली ही परिक्रमा अभूतपूर्व यशस्वी ठरली. संपूर्ण महाराष्ट्रात महिलांनी एकत्र येऊन, सर्व विभागांना भेटी देऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे आणि कौटुंबिक हिंसाचाराचा अभ्यास याबाबत सर्व विभागांना भेटी दिल्या. भारतामधून साडेसात हजार महिला कामगारांना भेटून त्यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचाराची प्रश्नावली भरून घेण्याचे काम निर्भयांच्यावतीने करण्यात आले. हे एक अभूतपूर्व कार्य होते. या कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली.

सन 2015 मध्ये अनेक मान्यवर सामाजिक संस्थांशी समन्वय साधून त्यांनी निर्भया सल्लागार समिती स्थापन केली. यामध्ये अनेक सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे, पोलीस, महिला संस्था समाविष्ट होत्या. निर्भया चळवळीस मार्गदर्शन करण्याचे काम या संस्था करित आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटने अंतर्गत आयटीएफच्या सहकार्याने औरंगाबाद, तुळजापूर, मुंबई आणि कोल्हापूर येथे महिलांचे स्वतंत्र भव्य दिव्य महिला मेळाव्याचे आयोजन शीलाताई नाईकवाडे यांनी केले. निर्भया चळवळीतील अनेक निर्भयांच्या कामकाजावर व निर्भया चळवळीवर अनेक डॉक्युमेंट्री बनवण्याचे काम शीलाताई नाईकवाडे यांनी केले. याची दखल संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली व आजही जगभरामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयाच्या कामकाजाचा गौरव करण्यात येतो व तिथे या डॉक्युमेंटरी अभ्यास म्हणून दाखविण्यात येतात.

एस टी बँकेच्या संचालक पदावर पण त्यांनी सात वर्ष काम केले आहे. या सर्व प्रवासात संघटनेच्या नेतृत्वाने म्हणजेच पितृतुल्य ताटेसाहेब व लाडके भाऊ संदिपदादा शिंदे यांनी दिलेली खंबीर साथ, वाढवलेले मनोबल त्यामुळेच ऐतिहासिक टप्पे गाठता आले. या सर्व प्रवासात सावली सारखी सोबत असणार्या कुटुंबीयांचा उल्लेख केला नाही तर तो कृतघ्नपणा ठरेल. शीलाताईच्या यशामध्ये, त्यांच्यावर आलेल्या अनेक अडचणी व संकटामध्ये त्यांना साथ देणारे त्यांचे पती संजय नाईकवाडे हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे त्यांचा हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. त्यांची दोन्ही मुले निखिल व निनाद त्यांच्या प्रत्येक कामात सहभागी होते. त्यांच्या सासरचे व माहेरचे सर्व कुटुंबाच्या सहकार्यामुळेच त्या या कामकाजात यशस्वी ठरल्या आहेत.

मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या