37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रआश्वासनपूर्ती न झाल्यास आंदोलन

आश्वासनपूर्ती न झाल्यास आंदोलन

एकमत ऑनलाईन

नगर : उच्चाधिकार समिती नियुक्त करून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले नियोजित आंदोलन स्थगित केले. मात्र, सहा महिन्यांत या मागण्यांवर सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर आम्हीच शेतक-यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारू, असा इशारा जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. बच्चू कडू यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली.

अण्णा हजारे यांनी शेतक-यांशी संबंधित मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी यावर तोडगा निघाल्याने त्यांनी हे आंदोलन स्थगित केले. त्यानंतर शनिवारी सकाळी बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. शेतक-यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील विभागनिहाय पिकांना हमीभाव व बाजार मूल्य मिळाले पाहिजे असे सांगून शेतक-यांसाठी केलेल्या मागण्या आणि आंदोलने यावर दोघांत चर्चा झाली.

कडू यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वामीनाथन आयोगासह शेतक-यांसंबंधी अन्य पंधरा मुद्यांवर सहा महिन्यांच्या आत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत. अन्यथा सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शेतक-यांना बरोबर घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल. बाजरी, भात, कापूस या पिकांना हमीभाव व बाजार मूल्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी आमचा आणि हजारे यांचाही पाठपुरावा सुरू आहे. आता केंद्र सरकारने आश्वासन दिले असल्याने हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू. जर हे प्रश्न समाधानकारक पद्धतीने मार्गी लागले नाहीत तर आम्हीच पुढाकार घेऊन आंदोलन उभारणार आहोत.

अण्णा भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते
अण्णा भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते म्हणून आलो होतो. ६० दिवस झाले तरी शेतकरी आंदोलन सुरू आहे. शांततेत चालू आहे. सरकार हट्टीपणा करतंय. कायदा ज्यांच्यासाठी आणला तेच जर आंदोलन करत असतील, तर ते मानलं पाहिजे.

बच्चू कडू यांचे कौतुक
समाजासाठी चांगले काम करणारी जी काही माणसे आहेत त्यात बच्चू कडू आहेत. निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. पण बच्चू कडू यांचे काम चांगले असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो़.अशा शब्दांत अण्णा यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे कौतुक केले.

सगळे डिटेल्स माझ्याकडे : अण्णा
आमच्यासमोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्यावेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईन, असा निर्वाणीचा इशारा अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला आहे. हजारे यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर उपोषण करण्याचे जाहीर करून ते मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामना मधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे?, असा खोचक सवाल केला होता त्यावर अण्णा यांनी संताप व्यक्त केला.

ममतांचे ४ शिलेदार भाजपच्या वाटेवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या