18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रयूपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससी परीक्षा!

यूपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससी परीक्षा!

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. आधीची बहुपर्यायी पद्धत बदलून आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी यूपीएससीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागू होणार आहे. यासंबंधी एमपीएससीने अभ्यासक्रमही जाहीर केला आहे. त्यात यूपीएससीचा अभ्यासक्रम काही अंशी बदल करून तसाच उचलल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणा-या तरुणाईमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, केवळ स्पर्धा परीक्षेशी संबंधित खाजगी क्लासेसची दुकानदारी चालविण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केल्याचा आरोप परीक्षार्थींकडून केला जात आहे.

एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा ही एकूण १७५० गुणांची असेल तर मुलाखत ही २७५ गुणांची असेल. अंतिम निकाल एकत्रितरित्या २०२५ गुणांवर लावण्यात येणार आहे. या नव्या पद्धतीची शिफारस एमपीएसचीच्या एक सदस्यीय समितीने केली होती. या समितीच्या कार्यपद्धतीवरच आता विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयोगाने ही नवीन परीक्षा पद्धत खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी जाहीर केली आहे का, असा प्रश्न पुण्यात अभ्यास करणा-या काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न यूपीएससीप्रमाणे बदलण्यासाठी एमपीएससीने एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी हे होते. समितीचा सदस्य हा कोणत्याही संस्था किंवा क्लासेसशी संबंधित नसावा, तसे असल्यास पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येऊ शकते. चंद्रकांत दळवी यांनी पुण्यातील २ सुप्रसिद्ध खासगी क्लासेसच्या कार्यक्रमांना अनेकदा उपस्थिती लावल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे या समितीने शिफारस केलेला पॅटर्न हा खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी फायदेशीर आहे का, खासगी क्लासेसचे यामध्ये हितसंबंध जपले गेले आहेत का, असा सवाल काही विद्यार्थांनी नाव न सांगण्याच्या अटींवर उपस्थित केला आहे.

परीक्षार्थ्यांच्या सूचनाही मागवायला हव्या होत्या
समितीच्या अहवालावर एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या सूचना मागवणे अपेक्षित होते. तसेच विद्यार्थ्यांना या संबंधी पूर्वसूचना देण्यात आल्या नाहीत, अशी तक्रार विद्यार्थी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

२०२३ पासून नवा अभ्यासक्रम लागू
१७ ऑक्टोंबर २०२२ रोजी एमपीएससीने पहिल्यांदा इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम प्रसिद्ध केला. नंतर तो अभ्यासक्रम मराठीत भाषांतरित करण्यासाठी एवढा कालावधी लावला. २०२३ पासून हा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना आता नव्याने तयारी करावी लागणार आहे.

आतापर्यंत तयारी केलेल्यांना फटका
एमपीएससीची तयारी एका दिवसात होत नाही. त्यासाठी अनेक वर्षे घासावे लागतात. गेल्या ५-७ वर्षांपासून लाखो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करीत आहेत. परंतु आता परीक्षा पद्धत बदलली जाणार असल्याने या परीक्षार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार नव्याने तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या