25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeमहाराष्ट्रएमपीएससी पूर्व परीक्षा परीक्षा लांबणीवर

एमपीएससी पूर्व परीक्षा परीक्षा लांबणीवर

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.९ (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोवर भरती नाही, अशी ठाम भूमिका घेत रविवारी होणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेला मराठा समाजाने तीव्र विरोध केल्यानंतर अखेर सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली.

कोरोनाच्या संकट वाढलं आहे, लॉकडाऊनच्या काळात शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी सारासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र वयोमर्यादेची अडचण येऊ दिली जाणार नाही, आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे मराठा संघटनांनी पुकारलेला शनिवारचा बंद मागे घेतला आहे. परीक्षेचा तिढा सुटला असला तरी परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या मंत्र्यांसह ओबीसी नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज नाराह आहे. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर शासकीय भरती करू नये अशी आक्रमक भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे रविवारी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही, सरकारने ही परीक्षा पुढे ढकलली नाही तर आम्ही ही परीक्षा उधळून लावू, असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता. तर परीक्षा पुढे ढकलल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे संधीला कायमचे मुकतील, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलू नका अशी भूमिका काही मराठा संघटना, ओबीसी संघटनांनी घेतली होती. यामुळे सरकार कात्रीत सापडले होते. यातून मार्ग काढण्यासाठी गेले दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र मार्ग निघण्याऐवजी वातावरण तापत चालले होते. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली व या बैठकीत रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली.

सारासार विचार करून निर्णय !
राज्यावर अजूनही करोनाचे संकट आहे. काही परीक्षार्थी कोरोनामुळे आजारी आहेत. लॉकडाउन संपले असले तरी संकट काही प्रमाणात अजूनही आहे. मध्यंतरीच्या काळात शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका बंद होत्या. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता परीक्षा कधी घ्यायची याचाही निर्णय लवकरच घेतला जाईल. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. तसेच आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत ते विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी पात्र असतील. वयोमर्यादेमुळे एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीनं पुकारलेला १० ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे.

ओबीसी नेत्यांची नाराजी !
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या मंत्र्यांसह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बऱ्याच कालावधीनंतर ही परीक्षा होत होती. मुलांनी अभ्यास केलेला असतो. परीक्षा पुढे ढकलल्याने या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. वयोमर्यादा ओलांडली गेली तर संधी कायमची हातातून जाते. त्यामुळे समन्वयाने मार्ग काढला गेला पाहिजे अशी भावना भुजबळ व वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

तलवारीपर्यंत गेली भाषा…….!
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरताना भाजपचे खा. संभाजीराजे यांनी गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा खणखणीत इशारा दिला. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी बोलताना, ‘संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा त्यांनी दिला. याला प्रत्त्युत्तर देताना, ‘राजा रयतेचा असतो, एका समाजाचा नसतो. तुम्ही तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा कशासाठी ? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.समनव्याने निर्णय झाला पाहिजे. शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

 

माजी डीजीपी पांडेंचे तिकीट निवृत्त हवालदाराला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या