पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या विविध परीक्षांच्या मुख्य परीक्षा यापुढील काळात चालू वर्षापासून वस्तुनिष्ठ स्वरुपात न घेता वर्णनात्मक स्वरुपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे निषेधार्थ एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात शुक्रवारी आंदोलन करत नवीन शैक्षणिक पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनात सहभागी झालेले काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे म्हणाले, आतापर्यंत एमपीएससी मार्फत वस्तुनिष्ठ स्वरुपात परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, माजी आयएसएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, विद्यार्थ्यांना एमपीएससीची मुख्य परीक्षा वर्णनात्मक पध्दतीने आगामी काळात द्यावी लागणार आहे. आमचा परीक्षा बदलास विरोध नसून नवीन पॅटर्न सन २०२५ पासून लागू केल्यास मुलांना परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळू शकेल.
आम्ही शेतकरी कुटुंबातून
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्ही शेतकरी कुटुंबातून एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मागील तीन ते चार वर्षापासून पुण्यात आलो आहोत. सात ते आठ महिन्यात वस्तुनिष्ठ परीक्षांऐवजी वर्णनात्मक परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा वेळ आम्हाला मिळालेला नाही.
भविष्याशी खेळू नये
राजकीय व्यक्ती निवडणुका घेण्यासाठी ज्याप्रकारे सोईने तयारीसाठी वेळ घेतात. तशाप्रकारे मुलांना परीक्षेच्या नवीन बदलाची तयारी करण्यासाठी वेळ पाहिजे असून सरकारने मुलांच्या भविष्याशी खेळू नये.
कायदेशीर कारवाईची नोटीस
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बळीराम डोळे यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावली आहे. १९ डिसेंबर २०२२ रोजी अहिल्या शिक्षण मंडळ, शास्त्री रोड, नवी पेठ पुणे येथील गेटसमोर एमपीएससी विद्यार्थ्यांनी याच मागणीकरीता आंदोलन केले होते. त्यानंतर एक महिन्याच्या आत पुन्हा अलका टॉकजी येथे आंदोलन केले जात असल्याने, या आंदोलनामुळे अनुचित घटना अथवा गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरुन प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटिस विश्रामबाग पोलिस ठाण्याने बजावली आहे.