22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी करणार!

मुंबई-पुुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी करणार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाला ओव्हरटेक करताना झालेल्या चुकीमुळे अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र चालकाने दिलेल्या वेगवेगळ््या माहितीमुळे शंका व्यक्त होत असल्याने याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. त्याचवेळी मुंबई-पुणे महामार्गावर होणा-या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा महामार्ग ८ पदरी करण्याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबाबत माहिती दिली. ज्या वाहनाला मेटे यांच्या गाडीची धडक बसली, तो ट्रॉलर मधल्या लेनमधून चालत होता. त्यामुळे विनायक मेटेंच्या ड्रायव्हरला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती. काही काळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ड्रायव्हर तिस-या लेनमध्ये गेला. तिस-या लेनमधूनही ओव्हरटेक करण्याच्या त्याने प्रयत्न केला. मात्र, पुढे एक वाहन होते. या २ वाहनांमध्ये जी जागा होती. त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटेंच्या ड्रायव्हरने केला आणि त्या नादात विनायक मेटे आणि त्यांचे अंगरक्षक गाडीत ज्या बाजूला बसले होते. त्या बाजूला जोरात धडक बसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहन ठरवून दिलेल्या लेनमधून जात नसल्याने अपघात होतात. या महामार्गावर तीन-तीन अशा सहा लेन आहेत. त्यापेक्षा हा मार्ग चार-चार पदरी केल्यास आणि त्यातील दोन लेन या अवजड वाहनांना राखून ठेवल्यास अपघातांची संख्या कमी होईल, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर बोलताना मुंबई-पुणे महामार्ग आठपदरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

मदत मिळण्यास विलंब
अपघातानंतर मेटेंच्या ड्रायव्हरने जेव्हा ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला, तेव्हा नवी मुंबई पोलिस मदतीसाठी तातडीने निघाले होते. पण अपघाताच्या धक्क्यामुळे ड्रायव्हर काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की लोकेशन सांगता आले नाही. आम्ही पनवेलजवळ आहोत इतकेच तो सांगू शकला. दरम्यान एक्स्प्रेस वेचे व्यवस्थापन पाहणा-या आयआरबी कंपनीला अपघाताची माहिती मिळाली. त्यांची मदत लगेच तिथे पोहोचली, पण दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचेपर्यंत मेटे यांचे निधन झाले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

एक्स्प्रेस वेवर आयटीएमएसचा वापर करणार
राज्य सरकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास एक्स्प्रेस वेवर होत असलेल्या हालचालींवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे सोयीचे होईल. त्याशिवाय ११२ क्रमांकावर जेव्हा कोणताही व्यक्ती मदतीसाठी फोन करेल, त्यावेळी तो मोबाईलवरूनच फोन करेल, हे गृहीत धरून थेट त्या व्यक्तीच्या फोनचे लोकेशन पोलिसांना कळेल, अशी व्यवस्था लवकरच करण्याचा विचार सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले.

मेटेंच्या अपघाताची सखोल चौकशी
विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश आपण सीआयडीला दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनीही दूरध्वनी करुन विनायक मेटे साहेबांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या