मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करताना केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकार मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला अभूतपूर्व अशी गती देणार असल्याची ग्वाही देत आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध योजना आणि प्रकल्प यात अडथळे आणले. मात्र, आता विकासाला पुन्हा गती आली आहे. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. येणा-या काही वर्षांत मुंबईचा कायापालट केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील सुमारे ४० हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ व पायाभरणी झाली. यावेळी बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. सभेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रीयन फेटा बांधून स्वागत केले. छत्रपती शिवरायांची मूर्तीही त्यांना भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवातही मराठीत केली. २०१४ पूर्वी मुंबईत मेट्रोचे फक्त १०-११ किमीचे जाळे होते.
नंतर विकासाला गती दिली गेली. आघाडी सरकारच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. भाजपा, एनडीए सरकारने कधी विकास कामात राजकारण आणले नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणणे योग्य नाही. मागच्या काळात वाईट अनुभव आला. छोटे फेरीवाले, दुकानदार यांच्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना आणली होती. मात्र, त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. पण राज्यात श्ािंदे-फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार आल्यानंतर विकासकामांनी वेग घेतला आहे. ट्रान्सहार्बर लिंक, धारावी पुनर्विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल.
मुंबईतील रस्ते नव्याने बनविण्यात येणार आहेत. हे प्रकल्प यशस्वीरित्या राबवायचे असतील तर स्थानिक महापालिकेची भूमिका महत्वाची असते. त्यानुसारच मुंबईच्या विकासात मुंबई महापालिकेची भूमिका महत्वाची राहणार आहे. राज्यात तर आता शिंदे-फडणवीस डबल इंजिन सरकार वेगाने कार्य करत आहे. आता मुंबई पालिकेसाठी विकासाला प्रतिसाद देणारे प्रशासन हवे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापालिका प्रचाराचा श्रीगणेशा केला.
आधुनिक होत असलेल्या मुंबई लोकल, मेट्रोचे व्यापक नेटवर्क, वंदे भारत, बुलेट ट्रेनची वेगवान कनेक्टिव्हीटी यामुळे येणा-या काळात मुंबईचा कायापालट होणार आहे. गरीब, मजूर ते कर्मचारी, दुकानदार आणि व्यवसाय सांभाळणा-यांना येथे राहणे सुस होईल. धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास पुन्हा ट्रॅकवर येत आहे. यासाठी मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो. मुंबईच्या रस्त्यांच्या विकासासाठी जे काम सुरू आहे तेदेखील महत्त्वाचे आहे. सगळयांचे प्रयत्न जेव्हा एकवटतात, तेव्हा सर्व गोष्टी शक्य होत असतात. सर्व मुंबईकर तसेच महाराष्ट्राला मी हा विश्वास देतो की शिंदे-फडणवीस ही जोडी तुमचे विकासाचे स्वप्न साकार करेल, असे पंतप्रधान म्हणाले.
तुम्ही दहा पावले चाला, आम्ही अकरा चालतो !
नवे सरकार आल्यानंतर पंतप्रधान स्वनिधी योजनेने वेग घेतला आहे. पाच लाख फेरीवाल्यांनी यात स्वारस्य दाखविले असून आज एक लाख लोकांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. सर्वसामान्यांना माझे आवाहन आहे की तुम्ही दहा पावले चला, मी तुमच्यासोबत अकरा पावले चालायला तयार आहे, असे मोदी म्हणाले.
भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला
गेल्या शतकात भारताची एक गरीब देश, दुस-यांच्या मदतीवर जगणारा देश, अशी प्रतिमा होती. मात्र भारताकडे एक सामर्थ्यशाली देश म्हणून बघितले जाते आहे. दावोसला नुकत्याच पार पडलेल्या इकॉनॉमिक फोरममध्ये त्याचे प्रतिबिंब दिसले. गेल्या आठ वर्षांत दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. भविष्याचा वेध घेणारी धोरणे आपण अंगिकारली. आज जगातील मोठ-मोठ्या अर्थव्यवस्था मंदीमुळे बेजार आहेत. पण भारतात ८० कोटी लोकांना आपण मोफत रेशन देऊन पोटाची भूक शमवत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
डबल इंजिन ट्रिपल इंजिनमध्ये रुपांतरित होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज केंद्रात व महाराष्ट्रात आपलेच सरकार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर विकासाचे हे डबल इंजिन हे ट्रिपल इंजिनमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. केवळ ६ महिन्यांत आमच्या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने अनेकांच्या पोटात दुखायला लागले आहे. आमच्यावर टीका सुरू आहे. मात्र जितकी टीका कराल त्याच्या दहा पट काम करून या टीकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काहींच्या बेईमानीमुळे विकासाला ब्रेक लागला – फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिनचे सरकार निवडून दिले. पण काही लोकांच्या बेईमानीमुळे सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे खरे अनुयायी आहेत. त्यांनी हिंमत केली व महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातील सरकार आले. त्यामुळे महाराष्ट्र विकासाच्या दिशेने पुन्हा जोरात धावत असल्याचे फडणवीस म्हणाले.