अहमदनगर : अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. हे आवाहन करताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही, हे दाखवून द्या, असंही पडळकर म्हणाले. दोन ते तीन दिवसांपूर्वीच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी आणि पडळकर आमनेसामने आले होते. त्यानंतर हे आवाहन करण्यात आलं आहे.
याबद्दल बोलताना पडळकर म्हणाले, जेव्हा हिंदुस्तानातल्या मुसलमान राजवटीत हिंदू संस्कृती, मंदिरं फोडली जात होती, तेव्हा हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी याच हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला. म्हणून सर्व अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की, ज्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर असे करावे, असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
या शहराचं नामांतराचा तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही दाखवून द्या की तुम्ही काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान करा. ही आपल्याकडून अपेक्षा आहे.