मुंबई : आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले असून याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंबद्दल जे बोलले जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीनआस्मानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळे दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्यÞेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत त्यामुळे मी त्यांना विचारले होते की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.
मला कोणीही सांगितले नव्हते तरी मी स्वत:च्या संपर्काने पंतप्रधानांशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला व्यवस्थित प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा संपर्क सुरु झाला. त्यानंतर त्यांची भेटही झाली. त्यावेळी मला पंतप्रधानांबाबत हे कळाले की कुटुंब प्रमुख कसा असावा? त्यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबियांप्रती असलेले प्रेम प्रतित होत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्व देतो. त्याचवेळी ते आपल्यापदाचा त्याग करणार होते.
राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ठाकरे होते नाराज
पण ते मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार होते. ही गोष्ट फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मलाच माहिती होते. पण मधल्या काळात भाजपच्या १२ लोकांचे निलंबन झाले होते. त्यावेळी भाजपकडून निरोप आला होता की आपली बोलणी सुरु आहे आणि असे निलंबन योग्य नाही. दरम्यान, नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबली.