पुणे : वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आता अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भारतामधील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्यानंतर काल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसली आहे.
कालपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. याच महागाईविरोधात पुण्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसने आज भर पावसात मोदी सरकारविरोधात आंदोलन केले आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा गाजलेला डायलॉग वापरत ‘अरे काय ते सिलिंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार’ म्हणत या आंदोलन करणा-या महिलांनी मोदी सरकारला टार्गेट केले आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत. गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
आठ वर्षांपूर्वी गॅसचा दर हा सहाशे रुपये होता आणि आता गॅस १०५३ रुपयांना मिळतो आहे. भाजप सरकार जेव्हा विरोधी बाकावर होते तेव्हा गॅसच्या किमती वाढल्या की सातत्याने आंदोलन आणि मोर्चा करायचे. त्यामुळे आम्हीसुद्धा तीच मागणी करत आहोत.
अर्थमंत्री निर्मला सातारामन आणि दरवेळी गॅससाठी आंदोलन करणा-या भाजप नेत्या स्मृती इराणी या संसार करतात त्यांना देखील महिलेच्या कामकाजाचा अनुभव आहे. मोदींना यात बोलण्यात काहीएक अर्थ नाही, असे मत शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या वैशाली नगोडे यांनी व्यक्त केले आहे.