पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान केला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार, पदाधिका-यांसह वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळी आत्मक्लेश आंदोलन केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अमोल मिटकरी, प्राजक्त तनपुरे, अतुल बेनके, संदीप क्षीरसागर, संजय दौंड, यशवंत माने, अशोक बापू पवार, सुनील टिंगरे, जयदेव गायकवाड, नितीन पवार यांच्यासह आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्याची जणू राजकारण्यांमध्ये स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. विशेषत: परराज्यातून येऊन विविध उच्च पदांवर बसलेल्यांकडून वारंवार अवमान होत असताना तो निमूटपणे पाहणे अत्यंत वेदनादायी आहे. चूक ही एकदा होऊ शकते, पण ती वारंवार होत असल्यास जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे रचलेले षडयंत्र असते. काही छुप्या हेतूंसाठी हे केले जात असल्याची शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.