मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत गरजेचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. या नेत्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
राज्यसभा निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ६ जूनला मतदान होईल. दोन्ही नेत्यांना मुंबई सत्र न्यायालयाने मतदानासाठी परवानगी दिली तर महाविकास आघाडीला २ मतांची मदत होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने एका-एका मताची फार मोठी किंमत लक्षात घेऊन तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानास परवानगी मिळविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असून, त्या पार्श्वभूमीवरच कोर्टात धाव घेतली गेली आहे.