22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeमहाराष्ट्रएनसीबीचे पथक आज मुंबईत; वानखेडेंची २ तास चौकशी, आजपासून तपासाला सुरुवात

एनसीबीचे पथक आज मुंबईत; वानखेडेंची २ तास चौकशी, आजपासून तपासाला सुरुवात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आज एनसीबीच्या दिल्लीतील मुख्यालयात पोहोचले. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे यांची वरिष्ठ अधिका-यांकडून जवळपास दोन तास चौकशी केली गेली, असे मीडिया रिपोर्ट्समधून दुपारी सांगण्यात आले. आता समीर वानखेडेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी तपासासाठी एनसीबीचे दक्षता पथक उद्या मुंबईला येणार आहे.

एनसीबीचे दक्षता प्रमुख ग्यानेश्वर सिंह हे या पथकासोबत असतील. हे पथक उद्यापासून तपासाला सुरुवात करणार आहे. यावेळी समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या इतर अधिका-यांचीही चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आज दिल्ली कार्यालयात हजेरी लावल्यानंतर समीर वानखेडे दिल्लीहून मुंबईला रवाना झाले. अंमली पदार्थप्रकरणी मुंबईत क्रूझवर समीर वानखेडे यांनी छापा टाकला होता. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. दरम्यान, आपण तपासासाठी कोणालाही बोलावले नाही. गरज असेल तेव्हा वानखेडे यांना बोलवेन, असे एनसीबीचे उत्तर विभागाचे उपमहासंचालक (डीडीजी) ग्यानेश्वर सिंह यांनी सांगितले.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी कोट्यवधींची डील झाल्याचा आरोप साक्षीदार प्रभाकर साईलने केला आहे. यांनाही यातील ८ कोटी रुपये देण्यात येणार होते, असा दावा प्रभाकर साईलने रविवारी केला होता. आर्यन खानला सोडण्यासाठी एनसीबीच्या अधिका-याने आणि इतरांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप आहे. या आरोपांप्रकरणी एनसीबीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

वानखेडेंविरुद्ध पोलिसांत तक्रार
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करत एका वकिलाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आला आहे. वकील सुधा द्विवेदी यांनी एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तसेच सहपोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंभे आणि राज्य लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या कार्यालयात लेखी तक्रार सादर केली. या तक्रारीत द्विवेदी यांनी वानखेडे आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

एनसीबीवर गुन्हा दाखल होणार?
आर्यन खान अटक प्रकरणी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत घडामोडींना वेग आला आहे. त्यातच मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्र्यांनी गुन्ह्याच्या प्रक्रियेबद्दल विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. पंच प्रभाकर साहिल प्रकरणी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, अशी विचारणा खुद्द गृहमंत्र्यांनी केली. त्यामुळे या प्रकरणी एनसीबीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या