26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने चालतो : जयंत पाटील

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्याच विचाराने चालतो : जयंत पाटील

एकमत ऑनलाईन

सांगली : राष्ट्रवादी पक्षाचे निर्णय मुंबईत होतात आणि काँग्रेसचे निर्णय मात्र दिल्लीत होतात, हा दोन्ही पक्षांमधील एवढाच फरक आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस पक्षाला चिमटा काढला. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसच्याच विचाराने चालतो, काँग्रेसची तत्त्व हीच राष्ट्रवादी पक्षाची तत्त्व आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस ही काही वेगळी काँग्रेस नाही. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं उभं आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या धोरण आणि विचारांमध्ये पक्ष बदल करत नाही असे देखील जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर मधील एकेकाळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते राहिलेले आणि वसंतदादा पाटील यांचे निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणा-या माजी आमदार संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी खानापूर नगरपंचायतीच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही दुस-याच कोणत्या पक्षात आलाय असे मानू नका. राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेसच्या विचारावरच, तत्त्वावर चालतो असा सल्ला पक्ष प्रवेश केलेल्याना जयंत पाटील यांनी दिला.

काँग्रेस अन वसंतदादाचे नातू विशाल पाटील यांचा गटही फुटला
संपतराव माने हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते म्हणून त्याकाळी ओळखले जायचे. खानापूर तालुक्याचे दोनवेळा ते आमदार झाले होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निष्ठावंत म्हणून संपतराव माने यांची विशेष ओळख होती. वसंतदादा पाटील यांच्या काळात सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्यात संपतराव माने यांचे कार्य मोलाचे राहिले.

वसंतदादांचे नातू आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी अलीकडेपर्यंत संपतराव माने यांच्या वारसदारांचे सख्य होते. मात्र काँग्रेस अंतर्गत गटबाजी आणि काँग्रेस पक्षामधून डावलले जात असल्याचा नाराजीतून आता संपतराव माने यांच्या वारसदारांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केल्याने खानापूर भागातील काँग्रेसबरोबरच वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचा गट ही फुटला.

आम्ही जिद्द सोडली नव्हती
विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीमध्ये कुणीही पक्षप्रवेश करत नव्हतं. याऊलट पेपर वाचला की राष्ट्रवादीमधून काहीजण बाहेर गेले. काही जण जाणार आहे आणि काही जणांची शक्यता आहे, अशा बातम्या वाचायला मिळायच्या, पण आम्ही जिद्द सोडली नव्हती. शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी झंझावती दौरे महाराष्ट्रभर सुरू केले. त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण बदलून गेले. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या देखील जागा वाढल्या. जवळपास शंभर जागांच्या जवळ दोन्ही पक्षाला यश मिळाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा पहायला मिळाला.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या