पुणे : पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रवादीच्या विरोधाला सामोरे जावे लागले. स्मृती इराणींच्या दौ-यावेळी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर महागाई विरोधात आंदोलन केले. काही कार्यकर्ते तर हॉटेलमध्ये शिरले. तसेच बालगंधर्वमध्ये घुसल्याने राडा झाला. पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इराणी यांच्या ताफ्यावर अंडे फेकण्याचाही प्रकार झाल्याचे समजते.
एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मंत्री स्मृती इराणी आज पुण्यात आल्या. हे कळताच कार्यक्रमस्थळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पोहोचल्या, आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योंकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या तर थेट सभागृहात घुसल्या. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
कॉंग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचेही आंदोलन
देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यादेखील मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या.