मुंबई : राज्यात गेल्यावर्षी कोरोनाचा मोठा उद्रेक झाला होता. त्यावेळी आरोग्यव्यवस्थेवर अचानक मोठा ताण निर्माण झाला होता. त्यापार्श्वभुमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची आणि घोषणांची माहिती दिली. राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, पुण्याच्या ससून रुग्णालयातल्या वर्ग ४ च्या कर्मचा-यांसाठी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातल्या वर्ग ४ मधील कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेला होता. पुढील वर्षी होणा-या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्र्यांनी या वर्गाला खूष करण्याचा प्रयत्न केला. ससून मधील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी २८ कोटी २२ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा केली.
दरवर्षी २ हजार नवीन डॉक्टर
नवीन सुरु होणारी वैद्यकीय महाविद्यालये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे सुरु होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. नवीन महविद्यालयांमुळे पदवी स्तरावरील १९९० तर पदव्युत्तर स्तरावरील १ हजार विद्यार्थ्यांच्या जागा वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरी आरोग्य सुविधांसाठी ५ हजार कोटी
दरम्यान, शहरी जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली नागरी आरोग्य संचालक कार्यालयाची निर्मिती करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी येत्या ५ वर्षांत ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातले ८०० कोटी या वर्षी उपलब्ध करून देण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले.
लोकसंख्या निम्मी आहे, तर महिला आरक्षण ३३ टक्केच का?