मुंबई : महाराष्ट्रात गेल्या १५ जून ते १७ जून या तीन दिवसांत चार हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आली होती. मात्र, आज महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली आली. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३८८३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर दोन जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २८०२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २२८२८ वर पोहोचली आहे, तर, राजधानी मुंबईत २०५४ कोरोना रुग्णांची नोंद झाली.
मुंबईत गेल्या २४ तासांत १७४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १३६१३ कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढायला लागल्यानंतर राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले होते. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे.